एम.पी.एस.सी. ची तयारी कशी करावी ?

स्पर्धापरीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांच्या अंगी  सकारात्मक दृष्टिकोन असणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता बदलत चालला आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी परीक्षेची सखोल तयारी करून स्पध्रेत उतरत आहेत. या परीक्षेसाठी बसणार्या विद्यार्थ्यांची संख्या आणि जागेची संख्या यात कमालीची तफावत आहे. मात्र योग्य तयारीने व जिद्दीने स्पर्धा परीक्षेच्या रिंगणात उतरले तर यश हमखास आहे. राज्यसेवेची तयारी करताना विद्यार्थ्यांने संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचादेखील विचार .करावा. कारण दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम एकमेकास पूरक आहे.

26 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर 2013 दरम्यान राज्यसेवेची मुख्य परीक्षा झाली. गेल्या काही वर्षांपासून आयोगाचा प्रश्न विचारण्याचा कल बदलेला आहे. आता प्रश्न थेट विचारले जात नाहीत. विद्यार्थ्यांना तो विषय किती समजला आहे, हे तपासून पाहण्याकडे आयोगाचा कल जास्त आहे. अभ्यासक्रमात जरी बदल नसला तरी मात्र प्रश्नपत्रिकेत बदल झाला आहे. तो विद्यार्थ्यांने योग्यप्रकारे समजून घेतल्यास त्यांना याचा नक्कीच लाभ मिळेल.

जर 2013 च्या मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा बारकाईने अभ्यास केल्यास खालील गोष्टी लक्षात येतात मराठी आणि इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सर्व प्रश्न अनिवार्य होते. एकच विषय देऊन त्या विषयावर मराठी प्रश्नपत्रिका आणि इंग्रजी प्रश्नपत्रिकेमध्ये 40 गुणांसाठी निबंध लिहावयाचा होता, विषयनिवडीचे विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य नव्हते. फक्त 10-15 निबंधाच्या विषयांची तयारी करून जाणार्या व लिखाणाची सवय नसणार्या विद्यार्थ्यांची फसगत झाली. ज्यांना इंग्रजी निबंध लिहिण्याची सवय नव्हती त्यांना तर इंग्रजीची प्रश्नपत्रिका अवघड गेली.2015 साठी तयारी करताना आत्तापासूनच विद्यार्थ्यांने इंग्रजी व मराठी लेखनाची सवय करावी. पूर्वपरीक्षा संपल्यानंतर जर मुख्य परीक्षेत कालावधी कमी असेल तर एवढया कमी कालावधीत या दोन प्रश्नपत्रिकांची तयारी पूर्ण होत नाही, म्हणून आतापासून वेगाने लिहिण्याची तसेच अक्षर सुवाच्च काढून कमीत कमी वेळेत कमीत कमी शब्दांत आपले विचार प्रभावीपणे कसे मांडू शकतो, याचा सराव करावा. काही विद्यार्थ्यांचा असा समज असतो की, या दोन प्रश्नपत्रिकांची विशेष तयारी न करता आपण मुख्य परीक्षेला सहज हे पेपर लिहू शकतो. मात्र हा फाजील आत्मविश्वास ठरू शकतो.सामान्य अध्ययनाच्या पेपरचा अभ्यास करताना महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी. ती म्हणजे पूर्व परीक्षेच्या सामान्य अध्ययनाच्या पेपर 1 चा अभ्यास करताना मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययनाच्या दृष्टीने अभ्यास केल्यास त्याचा लाभ राज्यसेवा पूर्व परीक्षेला तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षेला व केंद्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला नक्कीच होतो. पूर्व परीक्षेला व मुख्य परीक्षेत सामान्य अध्ययानाचा पेपर हा वस्तुनिष्ठ स्वरूपाचा असतो. अभ्यासक्रमातदेखील फारसा फरक नाही. उदा. पूर्व परीक्षेसाठी इतिहास अभ्यासताना भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास पूर्व व मुख्य परीक्षेत सारखाच आहे. त्यामुळे पूर्वपरीक्षेत या घटकाचा अभ्यास करताना वाचन सूक्ष्म रीतीने करावे, म्हणजे त्याचा लाभ मुख्य परीक्षेला होतो. गेल्या दोन वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केल्यास असे लक्षात येते की, पूर्व परीक्षेला जे प्रश्न विचारले जातात, त्यांचा दर्जा उच्च असतो. त्यामुळे उथळ अभ्यास करून उत्तीर्ण होणे कठीण आहे. भारतीय राज्यघटनेचा पूर्व परीक्षेचा अभ्यास करताना मुख्य परीक्षेचा पेपर 2 याचा अभ्यासक्रम पाहून तयारी केल्यास मुख्य परीक्षेचा बराचसा अभ्यास हा पूर्व परीक्षेत होऊन जाईल. राज्यसेवा 2013 चा पेपर 2 अभ्यासल्यास महत्त्वाची गोष्ट लक्षात येते की, फक्त पुस्तक वाचून किंवा गाईड वाचून अथवा पाठांतर करून ही परीक्षा उत्तीर्ण होणे आता कठीण आहे. यासाठी विषय नेमका समजून त्यावर सखोल चिंतन करावे. दोन-तीन विद्यार्थ्यांचा गट तयार करून महत्त्वाच्या मुद्दयांवर चर्चा करावी. अभ्यासक्रमातील मुद्यांची चालू घडामोडींबरोबर सांगड घालून अभ्यास करावा. गटचच्रेमधून एखादा अवघड विषय सोपा होतो व प्रत्येक मुद्याचा अभ्यास करणे शक्य होते.

2015 ची पूर्वपरीक्षा जर फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये असल्यास इंडिया इअर बुक हे बाजारात उपलब्ध होईल ते एकदा व्यवस्थित अभ्यासावे. त्याचा फायदा मुख्य परीक्षेच्या पेपर 3 व 4 साठी सर्वात जास्त होतो, किंबहुना मुख्य परीक्षेचा अभ्यास इंडिया इअर बुकच्या अभ्यासाशिवाय पूर्ण होत नाही. राज्यसेवेची तयारी करणारे खूप सारे विद्यार्थी `इंडिया इअर बुक`चा अभ्यास करत नाहीत. त्याचा फटका पूर्व- मुख्य परीक्षेला होतो.

अर्थशास्त्राचा अभ्यास करताना अर्थशास्त्राच्या संकल्पना व्यवस्थित समजून अर्थसंकल्प, भारताची व महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अभ्यासावी. यावर्षी पेपर 4 मधील अर्थशास्त्रावरील खूप सारे प्रश्न महाराष्ट्राची आर्थिक पाहणी व भारताची आर्थिक पाहणी याच्याशी संबंधित होते.

2015 च्या पूर्वपरीक्षेसाठी अभ्यास करताना पुढील गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात -

सर्वप्रथम पाचवी ते बारावीपर्यंतची राज्य पाठय पुस्तक मंडळाची पुस्तके व्यवस्थित वाचावीत. त्यातील प्रत्येक मुद्दा समजून घ्यावा. जर शक्य असेल तर कमीत कमी शब्दांत टिपण तयार करून ठेवावे. नवीन अभ्यासक्रमानुसार जी क्रमिक पुस्तके आहेत, ती पुस्तके राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेच्या तयारीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत, तसेच या पुस्तकांचा अभ्यास केल्याने कोणताही विषय सविस्तर समजणे जास्त सोपे होते, जे या स्पर्धा परीक्षेसाठी अत्यावश्यक असते. जर विषय आपणास समजला असेल तरच प्रश्न सोडवणे शक्य होते. नाहीतर प्रश्नपत्रिका सोडविताना गोंधळ होण्याची शक्यता जास्त आहे. अभ्यासक्रमात दिलेले घटक एक-दोनदा वाचून, समजून घ्यावेत, म्हणजे अभ्यासाची दिशा चुकत नाही. पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षा यांच्या अभ्यासक्रमातील सारखेच बिंदू काढून त्याचा सखोल अभ्यास करावा. म्हणजे पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोघांचा अभ्यास एकाच वेळी करणे शक्य होते. पूर्वपरीक्षा संपल्यानंतर जर मुख्य परीक्षेतला कालावधी कमी असेल तर कमीत कमी वेळात आपण जास्त अभ्यास करू शकतो. बाजारात विविध प्रकारचे अभ्यास साहित्य उपलब्ध आहे, तसेच निरनिराळ्या खासगी शिकवणी वर्गाच्या नोट्सदेखील सहजतेने उपलब्ध होतात. मात्र अभ्यास साहित्य वाचताना जर दर्जेदार पुस्तकांचे वाचन केले तरच त्याचा फायदा होतो, नाहीतर विनाकारण दर्जाहीन निकृष्ट अभ्यास साहित्य वाचल्याने पदरी निराशा येऊन वाटयाला अपयश येते.

चालू घडामोडी या घटकांचा अभ्यास करताना किती प्रश्न विचारले जातील, हे सांगणे कठीण असले तरी पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोघांचा विचार केल्यास चालू घडामोडींचे ज्ञान असल्याखेरीज आपण पेपर चांगल्या गुणांनी पास होणे कठीण आहे. त्यासाठी रोज साधारणत: एक ते दोन वृत्तपत्रांचे नियमित वाचन करून त्याचे टिपण काढावे व त्याचे वेळोवेळी वाचन करावे.

गेल्या काही वर्षांपासून आयोग प्रश्न विचारताना चार ते पाच कधी कधी त्यापेक्षा जास्त ओळींची माहिती देऊन त्यावर प्रश्न विचारते. असे प्रश्न सोडविताना जर आपण वृत्तपत्रांचे व्यवस्थित वाचन केलेले असेल तर आपण त्याचे उत्तर देऊ शकतो. परीक्षेच्या ऐनवेळी या घटकाचा अभ्यास करून योग्यप्रकारे तयारी होत नाही.

उदा. 28 ऑक्टोबर 2013 च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत पेपर 4 मध्ये पुढील प्रश्न विचारला होता-
अमेरिकेतील अंशत: टाळेबंदीबाबत पुढील विधाने पाहा, त्यातील कोणती चूक आहेत
1. अमेरिकेचे वित्तीय वर्ष 30 सप्टेंबरला संपते.
2. रिपब्लिकन्सनी अर्थसंकल्प मंजूर होऊ दिला नाही.
3. राष्ट्राध्यक्ष ओबामाचे आरोग्य देखभाल विधेयक केंद्रस्थानी होते.
4. रिपब्लिकन्सचे सिनेटमध्ये बहुमत आहे.
5. डेमोक्रटस्चा हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हज्वर पगडा आहे.
6. कामगारांची आवश्यक व अनावश्यक अशा दोन गटांत विभागणी.
7. इतर टाळेबंदी राहिस्तोवर विनावेतन सुट्टीवर.

या प्रकारचे प्रश्न आता एम.पी.एस.सी.च्या सर्व परीक्षांना उदा. साहाय्यक, उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक परीक्षांनादेखील विचारले जातात.

भूगोलाचा अभ्यास करताना महाराष्ट्राच्या व भारताच्या भूगोलाच्या अभ्यासासोबत जगाचा भूगोलदेखील अभ्यासावा. भूगोलाचा अभ्यास करताना समोर नकाशा ठेवावा. वाचताना एखाद्या शहराचा उल्लेख आला असेल तर ते शहर नकाशात पाहून घ्यावे. गेल्या काही वर्षांपासून आयोग प्राकृतिक भूगोलावर बरेच प्रश्न विचारत आहे. म्हणून भूगोलाचा अभ्यास करताना पृथ्वीचे अंतरंग, खडकांचे प्रकार, निरनिराळी भूरूपे, वातावरण, वारे, आवर्त-प्रत्यावर्त तसेच स्थानिक वारे सागराचे अंतरंग, सागर जलाची क्षारता, सागराच्या क्षारतेवर परिणाम करणारे घटक, भरती-ओहोटी, मानवी वंश त्याचे वर्गीकरण, देशात महाराष्ट्रात तसेच जगात आढळणार्या विभिन्न जातीजमाती, लोकसंख्या लोकसंख्येचे वितरण इ. घटकांचा निश्चित अभ्यास करावा.

राज्यसेवा पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षेच्या दृष्टीने पर्यावरण हा मुख्य घटक आहे. या संदर्भात वातावरण बदल, जैवविविधता, परिस्थितीकी, राष्ट्रीय उद्याने, जैवविविधता, वातावरण बदलासंदर्भात रिवो, कॅनकून परिषदांचा अभ्यास करावा. विज्ञानाचा अभ्यास करताना अवकाश तंत्रज्ञान, अणुऊर्जा, जैवतंत्रज्ञान, नॅनो तंत्रज्ञान यांचा अभ्यास करावा. तसेच मानवी आरोग्य विविध आजार यांचा अभ्यास करावा. पूर्वपरीक्षेला विज्ञानावर प्रश्न साधारणत: वैज्ञानिक घटकांवर व त्यांचा मानवासाठी होत असलेला उपयोग या घटकाच्या अनुषंगाने विचारले जातात. त्यामुळे हा घटक अभ्यासताना सर्वप्रथम पाचवी ते दहावीपर्यंतची पुस्तके वाचून ती समजून नंतरच या घटकाची तयारी करावी.

पूर्वपरीक्षेत सामान्य अध्ययन 1 व सामान्य अध्ययन 2 असे दोन पेपर असतात. सामान्य अध्ययन 1 बरोबर सामान्य अध्ययन 2 हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.

सामान्य अध्ययन पेपर 2 ची तयारी : या प्रश्नपत्रिकेत 80 प्रश्न 200 गुणांसाठी दोन तासांत सोडवायचे असतात. 18 मे 2013 रोजी जी परीक्षा झाली. त्यात विद्यार्थ्यांना पेपर 2 बाबत बर्याच अडचणी आल्या,

प्रामुख्याने वेळेचे नियोजन जमले नाही. कोणत्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे, याचा योग्य अंदाज बांधता आला नाही . 2015 य किंवा पुढील परीक्षेसाठी तयारी करताना या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रत्येक घटकासाठी जेवढा सराव करता येईल तेवढा सराव करणे आवश्यक आहे. या प्रश्नपत्रिकेमध्ये पुढील घटकांचा अंतर्भाव असतो.

1) आकलन - या घटकांतर्गत काही उतारे दिले असतात व त्यावर प्रश्न विचारले जातात. एमपीएससीच्या परीक्षेत आकलन या घटकांतर्गत उतारे हे मराठीत होते, ते मराठीत जरी असले तरी अगदी सोपे आहेत, त्यांचा सराव नाही केला तरी चालेल, या भ्रमात विद्यार्थ्यांनी राहू नये. कारण या

घटकांनीच 18 मे 2013 च्या परीक्षेत विद्यार्थ्यांना अडचणीत आणले. याची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचण्याचा वेग वाढवणे आवश्यक आहे. दैनिक वृत्तपत्र किंवा मासिके वाचताना वेगात वाचून त्यांचे लवकरात लवकर आकलन कसे करता येईल याचा सराव विद्यार्थ्यांनी आतापासूनच करावा. आकलनासाठी काही उतारे सोडवण्याचा सराव करावा. जर मागच्या परीक्षेत विचारलेले उतारे पुन्हा सोडवून काढलेत तरी त्याचा खूप फायदा होईल. कधी कधी घरी बसून उतारे सोडविताना ते सोपे वाटतात, म्हणून आपण या घटकाच्या तयारीकडे विशेष लक्ष देत नाही. परंतु परीक्षा केंद्रात स्थितीही भिन्न असते. कारण त्या दोन तासांत आपल्या मनावर प्रचंड दडपण असते व या दडपणाखाली सोपे उतार्यांवरचे प्रश्न चुकत असतात. हे सर्व टाळून जर यशस्वी व्हायचे असेल तर जास्तीत जास्त सराव करणे आवश्यक आहे.

2) निर्णयक्षमता व समस्या निवारण - संघ लोकसेवा आयोगाच्या मागच्या दोन वर्षांच्या परीक्षेचा तसेच 18 मे रोजी झालेली परीक्षा लक्षात घेता या घटकांसाठी निगेटिव्ह मार्किंगची पद्घत नव्हती, म्हणून या घटकांवरील प्रश्न विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम सोडवावेत.

3) सामान्य मानसिक क्षमता – या घटकांचा विद्यार्थ्यांनी व्यवस्थित सराव करावा. सामान्यत: बुद्घिमत्ता घटकांतर्गत प्रश्न विचारले जातात तसेच प्रश्न या उपघटकांमध्ये विचारले जातात. या घटकांची तयारी विद्यार्थ्यांनी आतापासून करावी.

4) मूलभूत अंकगणित व तक्ता आलेख - या घटकाबाबत विद्यार्थ्यांच्या मनात नेहमी भीती असते. कारण कोणत्या वेळी गणिताचा किती भाग समाविष्ट होईल हे सांगता येत नाही. मात्र 2011 व 2012 या संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षा व 18 मे ची परीक्षा यांचा विचार केल्यास या उपघटकावर जे प्रश्न विचारले गेलेत ते सोपे होते, याची तयारी करताना विद्यार्थ्यांनी काळ, काम आणि वेग, शेकडेवारी, सरासरी, जहाजाचा वेग इ.संबंधी उपघटकांचा व्यवस्थित सराव करावा.

5) इंग्रजी भाषेचे आकलन - 18 मे च्या राज्यसेवेच्या परीक्षेत या घटकावर दोन उतारे विचारले होते, यात जे उतारे दिले जातात. ते फक्त इंग्रजी भाषेतूनच असतात. त्याचे मराठी भाषांतर नसते. परंतु या उपघटकांवरील उतारे हे तुलनेने सोपे असतात. जर इंग्रजी वृत्तपत्र वाचण्याचा सराव केला तर हा घटक सोपा होतो.

No comments:

Post a Comment